लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पीक विम्याच्या ५० टक्के अनुदानापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून गत मार्च २०१७ पूर्वी निधी प्राप्त झाला; मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पीक विम्याच्या ५० टक्के अनुदानाच्या लाभापासून अद्यापही वंचित आहेत. जिल्ह्यातील शेतकरी दुबार -तिबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक विम्याच्या ५० टक्के अनुदानापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याच्या अनुदानाचा लाभ देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे-पाटील, शिवाजीराव देशमुख, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, नानासाहेब देशमुख, हेमंत देशमुख उपस्थित होते.पात्र शेतकरी अन् अनुदान वाटपाची माहिती द्या!सन २०१५ मध्ये किती शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन पिकाचा विमा काढला नाही, अशा पात्र शेतकऱ्यांची तालुकानिहाय माहिती, तसेच पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी प्राप्त झालेले अनुदान आणि किती शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचे अनुदान वितरित करण्यात आले नाही, याबाबत तालुकानिहाय माहिती देण्याची मागणीही करण्यात आली.
शेतकऱ्यांना पीक विम्याचे अनुदान तातडीने द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:43 AM