तरुणांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा!
अकाेला : येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे़ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नाेंदणी केल्यानंतरच संबंधित व्यक्तीला लस दिली जाणार असल्याने युवकांनी २८ एप्रिलपासून तातडीने नाेंदणी करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना़ संजय धाेत्रे यांनी केले आहे़ काेराेनाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे पालन करून लसीकरण केंद्रांत गर्दी टाळण्याचे आवाहन ना़ धाेत्रे यांनी केले आहे़
जलवाहिनी टाकली; माती रस्त्यावर
अकाेला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम वेगात सुरू आहे़ जुने शहरातील डाबकी राेड पाेलीस ठाण्यासमाेर जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रस्त्यालगत खाेदकाम केले हाेते़ जाळे टाकल्यानंतर रस्त्यावर माेठ्या प्रमाणात माती साचली असून ती न हटविता कंत्राटदाराने गाशा गुंडाळला आहे़ यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे़
जनता भाजी बाजारावर मनपाचा ‘वाॅच’
अकाेला : काेराेना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका प्रशासनाने जनता भाजी बाजार तसेच जैन मंदिरालगतच्या जुना भाजी बाजारात व्यवसाय करण्यावर निर्बंध घातले आहेत़ याठिकाणी व्यावसायिकांनी व्यवसाय थाटल्यास त्यांना तातडीने हुसकावण्यासाठी मनपा प्रशासनाने बाजार व अतिक्रमण विभागावर जबाबदारी साेपवली आहे़
३ मे राेजी उघडणार पार्किंगची निविदा
अकाेला : शहरात विविध कामासाठी दाखल हाेणाऱ्या नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाकडून ‘पार्किंग’ उपलब्ध करून दिली जाणार आहे़ त्यासाठी शहरातील १३ जागांची निवड करण्यात आली असून भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या जागेसाठी मनपाने निविदा प्रक्रिया राबवली आहे़ येत्या ३ मे राेजी निविदा उघडली जाणार आहे़
सफाई कर्मचाऱ्यांना हवी लाेटगाडी!
अकाेला : अरुंद व चिंचाेळ्या सर्व्हिस लाइनमध्ये जमा हाेणारा केरकचरा व घाण जमा करताना महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ अशा ठिकाणी नाल्यांची स्वच्छता केल्यानंतर जमा झालेली घाण व कचरा डाेक्यावर उचलून आणणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यांकडून लाेटगाडीची मागणी केली जात आहे़ मनपाने तयार केलेल्या अनेक लाेटगाड्या नादुरुस्त आहेत़
१६०२ जणांनी दिले नमुने
अकाेला : काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे़ दरम्यान, मनपाच्या विविध चाचणी केंद्रांत साेमवारी १६०२ नागरिकांनी नमुने दिले़ यामध्ये ४९९ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे़ तसेच ११०३ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली़ संबंधित संशयित रुग्णांचे नमुने पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत़
शहरातील २९० जण पाॅझिटिव्ह
अकाेला : शहरातील २९० जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल साेमवारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून महापालिकेला प्राप्त झाला़ यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत 91, पश्चिम झोन अंतर्गत 60, उत्तर झोन अंतर्गत 45 आणि दक्षिण झोन अंतर्गत 94 असे एकूण 290 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह प्राप्त झाले आहेत़