अकोला : नवविवाहितांना हुंड्यासाठी सासरच्या ठिकाणी विविध त्रासाचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आता नवीन नाहीत. मात्र, काळ बदलत असून, विचारधारासुद्धा बदलायला हवी. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. परिणामी विवाहितांचा हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दररोज जिल्ह्यातील २३ पैकी एकातरी पोलीस ठाण्याच्या दप्तरी दाखल होत आहे.
कधी घर घेण्यासाठी तर कधी व्यवसाय सुरू करण्यासाठी, कधी गाडी खरेदीकरिता अशा एक ना अनेक कारणांनी माहेरवरून पैसे आणून देण्याचा तगादा सासरच्या मंडळींकडून लावला जात असल्याचे पोलीस ठाण्यांमध्ये होत असलेल्या तक्रारींमधून समोर येत आहे. लग्न दोन्ही पक्षांकडून मोठ्या थाटामाटात आटोपले जाते. लग्न जमविताना सगळ्या गोष्टींवर वधू-वर पक्षाच्या वडीलधाऱ्यांनाकडून चर्चाही केली जाते. मग विवाह झाल्यानंतर जेमतेम एक किंवा दोन वर्षात असे काय घडते, की थेट माहेरवरून पैसे आणण्याची मागणी होऊ लागते आणि या मागणीपोटी केला जाणारा छळ त्या नवविवाहितेलाच भोगावा लागतो. अनेकदा तर ज्याच्यासोबत रेशीम गाठी बांधल्या जातात, तो पतीदेखील अशा वेळी साथ सोडत असल्याचे दिसून येते. पोलिसांकडे दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये पती दोषी नाही, असे कधीही आढळून येत नाही. छळ करणाऱ्या सासरच्या संशयित लोकांच्या यादीत पतीच्याही नावाचा समावेश असतो. यावरून केवळ क्षुल्लक कारणावरून व पैशांच्या मागणीसाठी नवविवाहितांचा छळ होत असल्याचे वास्तव आहे.
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
१ हुंडाबळी कायदा अस्तित्त्वात असला तरीदेखील या कायद्याची भीती दिवसेंदिवस समाजात कमी होताना दिसत आहे. हुंड्यामध्ये थेट रो हाऊस, दुकान, रिक्षा, कार खरेदीकरिता हजारो ते लाखो रुपयांची मागणी नवविवाहितेकडे माहेरुन रक्कम आणून देण्यासाठी केली जाते.
२ अनेकदा तर लग्न जमवितानाच हुंड्यावर चर्चा होते, वधूपक्षाकडे वरपक्षाकडून सर्रासपणे रोख रक्कम, दागदागिने, वाहनांच्या स्वरुपात हुडा मागितला जातो.
३ मुलगा - मुलगी एकमेकांना पसंत करत असले तरीदेखील हुंड्याची मागणी लग्न जमविण्यापूर्वी आजही केली जाते. जिल्ह्यातील गावपातळीवरच नव्हे; तर शहरामध्येसुध्दा अशा पध्दतीने हुंड्यासाठी बोली लागते.
हुंड्यात केली अजबच मागणी
साखरपुडा आटोपल्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असता अकोल्यातील एका वरपक्षाकडून चक्क मुलाला नोकरीसाठी १५ लाख रुपये, एक कार व अन्य चीजवस्तूंची अजब मागणी केली गेल्याने लग्न जमत जमता वधूपक्षाकडून मोडले गेले. वधूपक्षाच्या लोकांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.
हुंड्यासाठी छळाचे गुन्हे
२०१८ -
२०१९-
२०२०-