अकोला, दि. ८ : महान धरणात ७७.७0 टक्के जलसाठा उपलब्ध असताना महापालिका अकोलेकरांना सातव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे. नळांना मीटर लावल्यास दररोज पाणीपुरवठा करण्याच्या गप्पा प्रशासन करीत आहे. मीटर लावण्यासाठी नगरसेवकांचा विरोध नाही. अशा स्थितीत अकोलेकरांना सातव्या दिवशी पाणीपुरवठा का,असा सवाल उपस्थित करीत जोपर्यंत नागरिकांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत स्थायी समितीचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा देत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच स्थायी समितीचे कामकाज बंद केले. त्यामुळे नाइलाजाने सभापती विजय अग्रवाल यांना सभा स्थगित करावी लागली.महापालिकेत सोमवारी स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच नागरिकांना होणार्या गढूळ पाणीपुरवठय़ाचा मुद्दा नगरसेवक सुरेश अंधारे यांनी उपस्थित केला. प्रभागातील ७00 घरांना गढूळ पाणीपुरवठा होत असून, जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना वारंवार सूचना करूनही कामात सुधारणा होत नसल्याचे नगरसेवक अंधारे यांनी सांगितले. पाइपलाइन गळतीची समस्या दूर करण्याची कामे सुरू असून, ही समस्या तत्काळ दूर केली जाणार असल्याचे जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी नमूद केले. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना अकोलेकरांना सातव्या दिवशी पाणीपुरवठा होत असण्यावर नगरसेवक बाळ टाले, सतीश ढगे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत ३0 जुलै रोजी पार पडलेल्या सभेत प्रशासनाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिल्याची आठवण करून दिली. सभेत होणार्या निर्णयावर प्रशासन जर अंमलबजावणी करत नसेल तर सभा घेऊन उपयोग काय,असा सवाल बाळ टाले यांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रशासनाने आधी पाणीपुरवठय़ावर भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच स्थायी समितीचे कामकाज सुरू ठेवण्याचा आग्रह बाळ टाले, सतीश ढगे, सुरेश अंधारे, आशिष पवित्रकार, मंगला म्हैसने, रिजवाना शेख अजीज यांनी लावून धरला. नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता सभापती विजय अग्रवाल यांनी स्थायी समितीची सभा स्थगित केली.
आधी पाणी द्या, नंतर सभा घ्या!
By admin | Published: August 09, 2016 2:42 AM