राहुल सोनोने । लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु : प्रत्येक झाडाला पाण्याचा ग्लास देऊन सुकलेली पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत असल्याचे चित्र दिग्रस बु.परिसरात आहे. दुबार पेरणी करूनही पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट आहे. पातूर तालुक्यातील दिग्रस बु. परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली आहे. पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने उगवलेले अंकुर कोमेजत आहे; तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात पिके वर आलेली आहेत. या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आगळी वेगळी युक्ती काढली आहे. रोपांजवळ प्लास्टिकचे ग्लास ठेवून त्याला छिद्र करण्यात आले आहे. या ग्लासच्या माध्यमातून रोपांना पाणी देऊन पिके वाचवण्याची केविलवाणी धडपड शेतकरी करीत असल्याचे चित्र दिग्रस बु. परिसरात आहे. आधीच महागडे बियाणे घेऊन पेरणी केलेली आहे. ग्लासने पाणी देण्यासाठी दोन ते तीन हजार ग्लास लागतात; तसेच त्यामध्ये पाणी टाकण्यासाठी मजूर लावावे लागतात. ही न परवडणारी बाब असली, तरी पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी करीत आहेत. दिग्रस बु., दिग्रस खुर्द परिसरात पावसासाठी चिमुकले धोंडी मागत आहेत. दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर तिबार पेरणीचे संकट उभे आहे.आधीच कर्जाचा डोंगर असताना पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.