लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वोपचार रुग्णालयावर कोविड रुग्णांचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढू लागल्याने व्हेंटिलेटरही अपुरे पडत असल्याने रुग्णालय प्रशासनावरील ताण वाढला आहे. अशातच केंद्र सरकारकडून शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला ३६ व्हेंटिलेटर मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर पाठविले. त्यात अकोल्याचाही समावेश असून, शनिवारी सर्वोपचार रुग्णालयाला तब्बल ३६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले.कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दररोज वाढत असताना सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती; परंतु आता व्हेंटिलेटर मिळाल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम झाली असून, रुग्णांना व्हेंटिलेटसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.पर्यायाने अनेकांचा जीव वाचण्याची शक्यता वाढली असून, डॉक्टरांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
मनुष्यबळाचाही प्रश्न सुटण्याच्या मार्गावरकोविडच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागातर्फे कंत्राटी तत्त्वावर परिचारिकांसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदभरती राबविली होती. त्या अंतर्गत दररोज १० ते २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना सेवेत रुजू करून घेण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून राज्यातील विविध जिल्ह्यांना व्हेंटिलेटर मिळाले असून, त्यात अकोल्याचाही समावेश आहे. अकोला जीएमसीला ३६ व्हेंटिलेटर मिळाल्याने कोरोनाविरुद्धचा लढा आणखी सक्षमपणे लढता येईल.- डॉ. कुसुमाकर घोरपडे,प्र. अधिष्ठाता, जीएमसी, अकोला