अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्याचा संपूर्ण भार सर्वोपचार रुग्णालयावर पडत आहे. अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून सुटीवर गेल्या आहेत, तर संपूर्ण कारभार हा प्रभारी अधिष्ठातांच्या भरवशावर सुरू आहे.अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा बहुतांश कारभार हा प्रभारी अधिष्ठात्यांच्या खांद्यावरच चालत आला आहे; परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सर्वोपचार रुग्णालयावरील वाढता ताण पाहता या ठिकाणी पूर्णवेळ अधिष्ठातांची गरज आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याच्या काही दिवसांपूर्वीच पूर्णवेळ अधिष्ठात डॉ. शिवहरी घोरपडे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर जीएमसीचा कारभार पुन्हा प्रभारी अधिष्ठाता डॉ. अपुर्व पावडे आणि त्यानंतर लगेच डॉ. शिवहरी घोरपडे यांच्या खांद्यावर आला. १० जून रोजी डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी पूर्णवेळ अधिष्ठाता पदाची जबाबदारी स्वीकारली. जवळपास आठवडाभर कारभार सांभाळल्यानंतर त्यांनी वैद्यकीय रजा टाकली आहे. दहा ते पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळापासून त्या सुटीवर असून, सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर सोपविला आहे.