अकोला : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा थेट परिणाम सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागावर दिसून येत आहे. अत्यावश्यक असेल तरच लोक रुग्णालयात जात असल्याने ‘जीएमसी’ची ओपीडी १० टक्क्यांवर आली आहे.लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे; मात्र अत्यावश्यक सेवा असूनही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या गर्दीमध्ये लक्षणीय कमी दिसून येत आहे. साधारणत: सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण तपासणीसाठी यायचे; परंतु कोरोनामुळे लोक रुग्णालयामध्ये येण्यास घाबरत आहेत. याचा अंदाज सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात कमी झालेल्या गर्दीवरून लावता येतो. साधारणत: सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग सुरू राहतो. या ठिकाणी दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु गत २ महिन्यात ८० ते ९० टक्के रुग्णांची गर्दी कमी झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.