अकोला , दि. 0९ : थकीत वेतन अदा करण्यास प्रशासनासह सत्तापक्षाला अपयश आल्यामुळे मंगळवारी सफाई कर्मचार्यांनी पुकारलेल्या अभिनव आंदोलनादरम्यान महापौर, स्थायी समिती सभापतींसह अधिकार्यांना महापालिकेत प्रवेशास मज्जाव केला. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी सफाई कर्मचार्यांनी चले जाओच्या घोषणा देत महापालिकेचा परिसर दणानून सोडला. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासन व सत्ताधारी ठोस प्रयत्न करीत नसल्यामुळे कर्मचार्यांना थकीत वेतनाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन व शहरातील व्यावसायिक संकुलांना अद्यापही सुधारित कर आकारणी न केल्यामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. पुनर्मूल्यांकन व मालमत्ता करात वाढ करण्यासाठी प्रशासनाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा अपेक्षित आहे. तसे होत नसल्याने प्रशासनाची कुचंबणा होत आहे. परिणामी कर्मचार्यांच्या वेतनाची समस्या निर्माण झाली आहे. त्या पृष्ठभूमीवर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी आंदोलन छेडले. यावेळी पी.बी. भातकुले, अनुप खरारे, शांताराम निंधाने, हरिभाऊ खोडे, विजय सारवान, रमेश गोडाले, धनराज सत्याल, गुरू सारवान यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सफाई कर्मचा-यांचे ‘चले जाओ’ आंदोलन
By admin | Published: August 10, 2016 1:10 AM