अकाेला : शरीरप्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी पुरुषांसोबतच महिलाही ‘मॉर्निंग वॉक’ला जाण्याचे प्रमाण हल्ली वाढलेले आहे; मात्र भल्या पहाटे रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत असाल तर सावधानता बाळगणे गरजेचे आहे. विशेषत: संधीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याच्या घटना अकाेला शहरातील विविध मार्गांवर घडल्या असून यामधील काही चाेरट्यांना अटकही करण्यात आली आहे़.
अकाेला शहरातील विविध ठिकाणी तसेच हिरवळ असलेल्या मार्गांवर माॅर्निंक वाॅकला जाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे़ महिला युवतींसह वृध्दही सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर निघत असल्याचे दिसून येते़ शहरातील डाॅ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर, मलकापूर, गाैरक्षण राेड, रिंग राेड, काैलखेड, जठारपेठ ते उमरी राेड, जुने शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराच्या समाेरील भाग, लाेणी राेड, जिल्हाधिकारी कार्यालय राेड, राम नगर, न्यू तापडीया नगर, सातव चाैक यासह विविध परिसरात फिरणाऱ्यांची संख्या खूप आहे़ या ठिकाणी सकाळच्या सुमारास ‘मॉर्निंग वॉक’ला व सायंकाळी फिरणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यात सुदृढ आरोग्यासाठी आग्रही भूमिका असलेल्या महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या व आराेग्यासाठी सायंकाळी घरासमाेर किंवा घराजवळच्या माेकळ्या राेडवर फिरणाऱ्या काही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चाेरट्यांनी पळविल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ त्यामुळे महिलांनी सकाळी व सायंकाळी घराबाहेर फिरायला जातांना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहरातील मंगळसूत्र चोरीच्या घटना
२०१९ - ६३
२०२० - २८
२०२१ - १७
गेलेले मंगळसूत्र मिळतच नाही
निनावी क्रमांकाच्या दुचाकी वाहनावरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पोबारा करतात. मागून चेहरा ओळखणेही कठीण असते. त्यामुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नाही. परिणामी, चोरीला गेलेले मंगळसूत्र परत कधीच मिळत नाही.
मंगळसूत्र चोरीला गेले ते गेलेच!
२०१९ मध्ये सकाळच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या दोघांनी गळ्यातील मंगळसूत्र पळविले. याप्रकरणी तेव्हाच पोलिसांत तक्रारदेखील केली; मात्र अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नाही. मंगळसूत्र चोरी गेले ते गेलेच!
- स्मीता चांडक
पोलीस म्हणतात, अद्याप तपास सुरू आहे..?
महिलांनी ‘मॉर्निंग वॉक’च नव्हे; तर इतर कुठेही बाहेर फिरत असताना अंगावरील दागिने सांभाळायला हवे. गळ्यातील मंगळसूत्र लांबविणारे चोरटे सराईत असतात. त्यांची अनेकदा ओळखच पटत नाही. तरीदेखील तपास केला जात आहे.
- सचिन कदम, शहर पाेलीस उपअधीक्षक अकाेला
अनेक चाेऱ्यांचा तपास पूर्ण
लग्नातून परत जाताना किंवा सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र चाेरी करणाऱ्या टाेळीला अकाेला पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत़ यामधील बहुतांश मंगळसूत्र चाेरीचा तपास लावण्यात पाेलिसांना यश आले आहे़ मात्र काही प्रकरणात चाेरटे परराज्यातील असल्याने शाेध लागला नसल्याचेही वास्त्व आहे़ मात्र हे प्रमाण प्रचंड कमी आहे़