सेना-भाजपा आणि काँग्रेस विदर्भातून हद्दपार व्हावे हेच ध्येय - वामनराव चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:16 IST2019-04-15T13:16:10+5:302019-04-15T13:16:18+5:30
वेगळ््या विदर्भ राज्याच्या लढाईत सेना-भाजपा आणि काँग्रेसने येथील जनतेला केवळ मतांसाठी वापरून घेतले आहे.

सेना-भाजपा आणि काँग्रेस विदर्भातून हद्दपार व्हावे हेच ध्येय - वामनराव चटप
अकोला: वेगळ््या विदर्भ राज्याच्या लढाईत सेना-भाजपा आणि काँग्रेसने येथील जनतेला केवळ मतांसाठी वापरून घेतले आहे. त्यामुळे आता या तिन्ही राजकीय पक्षांना विदर्भातून हद्दपार करणे, हेच आमचे ध्येय आहे, अशी माहिती माजी आमदार तथा विदर्भ निर्माण महासंघाचे संयोजक अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
विदर्भ निर्माण महासंघातर्फे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढाईच्या दृष्टिकोनातून विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात विदर्भ निर्माण महासंघाने आपले उमेदवार विविध पक्षांशी आघाडी करून दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामध्ये स्वभाव शेतकरी संघटना, जनसुराज्य पार्टी, नागविदर्भ आंदोलन समिती, लोकजागर पार्टी, जांबुवंतराव धोटे विचारमंच आदींचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या उमेदवारांच्या विजयासाठी आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे, रास्त भाव, कर्जमुक्ती, पूर्णवेळ २० सिंचनाचा अनुशेष व अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावणे त्याच सोबत बेरोजगारी दूर करणे, नक्षलवादाला सामाजिक प्रवाहात आणून त्यांना आर्थिक संपन्न करणे, आदिवासी भागातील कुपोषण थांबविणे, विदर्भातील औष्णिक वीज प्रकल्पात नवीन संपत्ती, नवीन तंत्रज्ञान वापरून प्रदूषणमुक्त करणे तसेच या भागाला खनिज संपत्ती, वनसंपत्ती, मनुष्यबळ संपत्ती प्रबळ करण्यासाठी सर्व विदर्भवादी उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. त्यासाठी अकोला लोकसभेतून गजानन हरणे यांना समर्थन देण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, शेतकरी संघटना विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष डॉ. नीलेश पाटील, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडी प्रमुख रंजना मामडे, सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड, शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख अविनाश नारकर यांची उपस्थिती होती.