अकोला: नोकरीत कायम करण्याचे आमिष दाखवून एका युवकाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणातील आरोपी निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांचा जामीन बुधवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एस. जांभळे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर २४ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राधादेवी गोयनका महाविद्यालयातील वसतिगृहामध्ये रोजंदारीवर काम करणार्या युवकाला नोकरीत कायम करण्याचे आमिष दाखवून निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांनी त्याचे लैंगिक शोषण केले; परंतु नोकरीत कायम करीत नसल्याचे लक्षात आल्यावर युवकाने या दोघांच्या अश्लील कृत्याची मोबाइलद्वारे चित्रफीत काढली आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीनुसार दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयामधून जामीन मिळत नसल्याने गोयनका व रुंगटा हे सोमवारी पोलिसांना शरण गेले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवून दुसर्या दिवशी त्यांची कारागृहात रवानगी केली. आरोपींच्या वतीने अँड. मुन्ना खान, अँड. बी.के. गांधी यांनी बुधवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एस. जांभळे यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर २४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
गोयनका, रुंगटा यांचा जामीन अर्ज फेटाळला!
By admin | Published: August 21, 2015 1:17 AM