अकोला : फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर उसळी घेतलेल्या सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण पहावयास मिळत असून, महिनाभराच्या कालावधीत सोने प्रतितोळा तीन हजार २०० रुपयांनी, तर चांदी प्रतिकिलो ६४०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. २ फेब्रुवारी रोजी जीएसटी वगळता प्रतितोळा ५९,४०० रुपये असलेले सोने २ मार्च रोजी ५६,२०० रुपये, तर प्रतिकिलो ७१,४०० रुपयांवर असलेली चांदी आज रोजी ६५,००० रुपयांवर स्थिरावल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
सोन्या-चांदीतील गुुंतवणूक सुरक्षित मानली जात असल्याने आजही भारतीयांची प्रथम पसंती या मौल्यवान धातूंना आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गत महिन्यात सोने व चांदीच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली होती. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याने सोन्याचे भाव साठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली होती.सोन्याच्या दरात झालेली वाढ पाहता अनेक ग्राहकांनी खरेदीचा बेत पुढे ढकलला होता. संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पहावयास मिळाला. २७ फेब्रुवारीपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच राहिली. २ मार्च रोजी सोने व चांदीचे दर अनुक्रमे ५६,२०० रुपये प्रतितोळा व ६५,००० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले.सराफा बाजारात गर्दीगत महिनाभर वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतलेल्या ग्राहकांची पावले घसरलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत. लग्नसराईचे दिवस व भावातील घसरणीचा परिणाम म्हणून गत दोन दिवसांपासून सराफा बाजारात गर्दी वाढल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम म्हणून आपल्याकडेही सोन्याचे दर कमी होत आहेत. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे.मनीष हिवराळे, सराफा व्यावसायिक, अकोला