लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नरहरी डाइप्रेस येथून शुक्रवार ३१ जुलै रोजी सकाळी चोरीस गेलेले सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यास शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाला यश आले. या चोरीनंतर पोलिसांनी चोरट्याचा छडा लावत त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट जप्त केले.सराफा बाजारातील नरहरी डाइप्रेस येथून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख रुपये किमतीचे १७ ग्रॅम सोन्याचे बिस्कीट शुक्रवारी सकाळी लंपास केले होते. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, या चोरीची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकानेही चोरट्यांचा शोध सुरू केला असता मोठी उमरी येथील लोखंडे लेआउटमधील रहिवासी अशोक बापूराव पैठणकर याने सदर सोन्याचे बिस्कीट चोरी केल्याची माहिती समोर आली. या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख अमित डहारे यांनी सदर चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १७ ग्रॅम सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाचे अमित डहारे, जितेंद्र हरणे, नदीम, राज चंदेल, विनय जाधव, रवी घिवे यांनी केली.
सोन्याचे बिस्किट चोरी प्रकरणाचा १२ तासात छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 10:17 AM