अकोला : मागिल तीन आठवड्यात तब्बल दीड हजार रूपयांनी सोने चकाकले आहे. कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव उसळल्याने सराफा बाजारात तेजी आली आहे. या भाववाढीमुळे ग्राहक आणि गुंतवणूक दारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नोटाबंदी आणि तीन टक्के जीएसटी लागल्यानंतर सोन्याचे भाव जवळ-जवळ स्थीरावले होते. कधीकाळी चढतीवर असलेल्या सोन्याचे भाव स्थीरावल्याने अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. सणासुदीच्या कार्यकाळातही सोन्याच्या भावात फार बदल झाला नाही. मात्र २०१९ वर्षांत सोन्याची चकाकी वाढली. मागिल तीन आठवड्यात सोन्यात तेजी आली. तब्बल दीड हजार रूपयांनी सोन्याचे भाव वधारले. त्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघेही पुन्हा सराफा बाजाराकडे वळले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे भाव ३२०० प्रती दहाग्रॅम होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या भावाचा आलेख वाढतच गेला. पाचशे- हजार रूपयांची भाववाढ सातत्याने सुरू राहील्याने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दराने ३४००० चा आकडा पार केला. त्यामुळे गत काही दिवसांपासून सोन्याच्या गुंतवणुकीपासून दूर गेलेले लोक आता पुन्हा नव्याने सराफा बाजाराकडे वळले आहे. सोन्याचे भाव वधारल्याने शेअरबाजार खाली येण्याचे चिन्ह व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीमुळे सोन्याची चकाकी वाढली आहे. सोन्यात ट्रेडिंग करणारेही पुन्हा बाजारपेठेकडे वळले असून व्यापारासाठी हे चांगले संकेत असल्याचे बोलले जात आहे. सोन्याचे भाव काही दिवसात आणखी वाढणार असल्याचे काही जाणकारांचे मत आहे. जानेवारी महिन्याच्या तीन आठवड्यात तब्बल दीड हजाराने सोन्याचे भाव वधारल्याने अकोल्याच्या सराफा बाजारातील उलाढाल वाढली आहे.