अकोला: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षनेता साजीद खान, नगरसेवक गजानन गवई, उषा विरक यांना शुक्रवारी रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका केली. महापालिकेच्या सभेत गोंधळ घातल्यामुळे या तिघांसह माजी नगरसेविका वंदना वासनिक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, वासनिक वगळता इतर तिघांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली. महानगरपालिकेची आमसभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजीद खान, नगरसेवक गजानन गवई, नगरसेविका उषा विरक व वंदना वासनिक यांनी जमावासोबत येऊन या सभेमध्ये गोंधळ घालणे सुरू केले. खिचडीचा कंत्राट व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळय़ावरून प्रचंड नारेबाजी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच महापौर उज्ज्वला देशमुख व उपमहापौर विनोद मापारी यांच्याशी असभ्य वागणूक करीत वाद घातला. खिचडी महापौर व उपमहापौरांच्या दिशेने फेकण्यात आली तर चप्पलही भिरकावण्यात आली. महापालिका सभागृहात असभ्य वागणुकीचा कळस गाठण्यात आल्याने या प्रकरणाची तक्रार मनपाचे नगरसचिव जी.एम. पांडे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून साजीद खान, गजानन गवई, उषा विरक व वंदना वासनिक यांच्यासह २00 ते २५0 जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४३ (गैरकायद्याची मंडळी जमा करणे), ३५३ (शासकीय कर्मचार्यास धक्काबुक्की करणे), १८६ (शासकीय कामात अडथळा निर्माण करणे), ४४८ (अनधिकृतरीत्या प्रवेश करणे), ३४२ (डांबून ठेवणे), २९४ (शिवीगाळ करणे), ५0४ (धमकावणे), ५0६ (जीवे मारण्याची धमकी), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्री कोतवाली पोलिसांनी साजीद खान, उषा विरक व गजानन गवई यांना अटक करण्यात आली; मात्र त्यांच्यावरील कारवाई जामीनपात्र असल्याने त्यांची काही वेळातच सुटका करण्यात आली.
गोंधळी नगरसेवकांसह २00 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: August 15, 2015 1:29 AM