अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मीडियावरून नातेवाईक, पक्षातील कार्यकर्त्यांसह ओळखीच्या लोकांचे ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’चे असंख्य मेसेज येतात. संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकासोबत चांगले बोलावे, गोड बोलावे असे घरातील कर्ते पुरुष सांगतात. राजकारणात वावरताना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे. खोट्यांच्या दुनियेत सत्य बोलण्याची गरज आहे. कारण गोड बोलून काम साधण्याच्या प्रवृत्ती पाहता आता सत्य बोलण्याची वेळ आली आहे.भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी, दसरा, मकर संक्रांतीसह विविध सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांशीच गोड बोलण्याची प्रथा असून, गोड बोलण्याबरोबरच पाय जमिनीवर ठेवून सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आजकाल गोड व खोटे बोलून काम साधणाºयांची मोठी फळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या समस्या निकाली काढण्याला मी प्राधान्य देतो. त्यावेळी केवळ गोड बोलून कसे होणार, नागरिकांची समस्या मार्गी लागली पाहिजे. समस्या सुटत नसेल आणि फक्त गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल, तर त्या गोड संवादाला अर्थ राहत नाही. त्यामुळेच ‘गुड बोला, गोड बोला’ पण सत्य तेच बोला, हे आवर्जून सांगावेसे वाटते.कोणाचे आपसात कितीही वैर असले, तरी त्यास तिळगूळ दिल्यास वैर संपते. कोणी स्तुती अथवा निंदा केली तर मनाला लावून न घेता त्याचे मोठ्या मनाने स्वागत केले पाहिजे, हेच भारतीय संस्कृतीचे संस्कार आहेत.