अकाेला : खाेलेश्वर येथील रहिवासी तथा खदाण व्यावसायिक गाेपाल अग्रवाल यांची शनिवारी अज्ञात मारेकऱ्यांनी गाेळया झाडून हत्या केल्यानंतर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने पथकाचे गठण केले. या मारेकऱ्यांचा शाेध सुरू केला असून अग्रवाल यांच्यावर गाेळ्या झाडणाऱ्यांसाेबत असलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती पाेलिसांनी रविवारी सुरू केली आहे. गाेपाल हनुमंतप्रसाद अग्रवाल ४५ यांच्या बंधूची बाेरगाव मंजू येथे गिट्टी खदाण आहे. या गिट्टी खदाणवर व्यवस्थापक असलेले गाेपाल यांनी काही कामगारांचे काम याेग्य नसल्याने त्यांना कामावरून कमी केले हाेते. या कारणावरून तसेच त्यांच्याकडील दाेन लाख रुपयांची राेकड लुटण्याच्या बेतात असलेल्या टाेळीने त्यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. गाेपाल अग्रवाल यांचा वाढदिवस असलेल्या दिवशीच त्यांची हत्या केल्याने आराेपींनी इत्थंभूत माहिती घेऊन प्रचंड द्वेषाने हे हत्याकांड घडविल्याची माहिती पाेलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अग्रवाल यांच्यावर एकूण चार गाेळ्या झाडल्याची माहिती समाेर आली असून यामधील दाेन गाेळ्या एक ताेंडात तर दुसरी छातीत लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर, घटनास्थळावर दाेन जिवंत काडतुसेही आढळली. त्यानंतरही डाेक्यावर दगडाने हल्ला करीत त्यांना जागेवरच मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला; या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी पहाटे या प्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, आर्म्स ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ, पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आराेपींचा शाेध सुरू केला. दरम्यान, २४ तासांनंतर पाेलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. यावरूनच काही संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची झाडाझडती सुरू आहे. साेमवारी या प्रकरणातील आराेपींचा चेहऱ्यावरील पडदा बाजूला हाेणार असल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे.
चार जण ताब्यात असल्याची चर्चा
गाेपाल अग्रवाल यांच्या हत्याकांड प्रकरणात चार जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा जाेरात आहे. यामध्ये गाेपाल अग्रवाल यांचे माेबाइलवरून लाेकेशन देणारा, दुसरा आराेपीला घेऊन जाणारा आणि गाेपाल अग्रवाल यांच्या मागावर असलेल्या दाेघांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पाेलिसांकडून या वृत्ताला अधिकृत दुजाेरा देण्यात आला नाही. साेमवारी या घटनेतील आराेपींचा चेहरा समाेर येणार असल्याची माहिती आहे.
गाेपाल अग्रवाल यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या करणाऱ्या आराेपींच्या मुसक्या लवकरच आवळण्यात येणार आहेत. पाेलीस आराेपींच्या मागावर असून मुख्य आराेपीस २४ तासांत बेड्या ठाेकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, या हत्याकांडाचा उलगडा लवकरच करण्यात येणार आहे. संशयितांची झडती सुरू आहे.
- जी. श्रीधर, पाेलीस अधीक्षक, अकाेला