लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रस्त्यावरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने या मार्गावरील मालमत्तांचे मोजमाप केले. प्रशासनाच्यावतीने संबंधित मालमत्ताधारकांना नोटिस पाठविण्यात आल्या असून, न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील प्रमुख रस्ते टिकाऊ आणि दज्रेदार व्हावेत, यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांच्या निधीतून नेहरू पार्क चौक ते तुकाराम चौकापर्यंत सिमेंट रस्ता प्रस्तावित करण्यात आला. रस्ते दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होत आहेत. नेहरू पार्क ते तुकाराम चौकापर्यंंतचा रस्ता १५ मीटर रुंद केला जाणार आहे. अशा स्थितीत गोरक्षण रोडवरील महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंत हा रस्ता केवळ ११ मीटर रुंद केला जात आहे. इन्कम टॅक्स चौकातील इमारतींमुळे रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला असून, या ठिकाणी ‘बॉटल नेक’ तयार होण्याची शक्यता आहे. संबंधित इमारतींना हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र रस्त्याचे निर्माण कार्य सुरू ठेवल्याचे दिसून येते. यादरम्यान, मनपा प्रशासनाने महापारेषण कार्यालय ते थेट लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंतच्या मालमत्तांचे मोजमाप केले असता मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम झाल्याचे समोर आले आहे. सदर अवैध बांधकाम पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मालमत्ताधारकांना नोटिस जारी केल्या असून, न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल करण्यात आला आहे.
म्हणे नियमानुसार बांधकाम!इन्कम टॅक्स चौकात बड्या बांधकाम व्यावसायिकांची वाणिज्य संकु ले आहेत. मनपाच्या नगररचना विभागाने मंजूर केलेल्या नकाशानुसारच इमारतींचे बांधकाम केल्याचा दावा संबंधित बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. प्रत्यक्षात मनपाच्या मोजमापात मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून मनपा प्रशासनावर राजकीय दबावतंत्राचा वापर होण्याची शक्यता आहे. या दबावतंत्रासमोर प्रशासन झुकते का, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.