वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासोहब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्यासह प्रदीप वानखडे , हिरासिंग राठोड यांनी मुंबइ येथील मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निधी मागणीचे निवेदन सादर केले.त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत बांधकामासाठी २६ कोटी ७६ लाख रुपये, पातूर व तेल्हारा पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकामासाठी प्रत्येकी ५ कोटी तसेच अतिवृष्टीमुळे प्रभावीत जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी २३ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली. त्यामध्ये ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत कामे मंजूर करण्याचे आश्वासनही ग्रामविकास मंत्र्यांनी दिले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना जिल्हा परिषदमार्फत मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे वाटप योजनेसाठी १५ कोटी व दलित वस्ती निधी अंयासोबतच तर्गत मातंग समाजाकरिता २० कोटी रुपये निधी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. तसेच दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत दुधाळ जनावरांच्या किंमतीमध्ये ४० हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे करण्यात आली. त्यानुषंगाने दुधाळ जनावरांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याच्या सूचना पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिल्या.
जनावरांच्या वैद्यकीय सेवेसाठी
फिरती रुग्णवाहिका मिळणार!
जिल्ह्यातील जनावरांच्या वैद्यकीय सेवेसाठी फिरती रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली असता, जनावरांच्या वैद्यकीय सेवेसाठी जिल्हा परिषदेला फिरती रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याची ग्वाही पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिली.
आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे
भरणार;आरोग्यमंत्र्यांची ग्वाही!
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील १७७ रिक्त पदे भरण्याची मागणी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिले.