लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या एकूण नोटांपैकी १८ टक्के नकली आहेत, ती आकडेवारी सरकारने अद्यापही जाहीर केली नाही. रिझर्व्ह बँकेनेही नोटांचा तपशील उघड केला नाही. यापुढे कधीही ती माहिती पुढे येणार नाही. नकली नोटांची माहिती दडवून सरकार घालवलेली अब्रू वाचवत आहे, या विधानाने रिझर्व्ह बँक आणि सरकारची अब्रू जात असेल, तर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावाच, असे आव्हान भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिले.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर भाजप सरकारची नीतिमत्ततेवर प्रश्न निर्माण केले. सरकारचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसला आहे. दहशतवाद रोखणे, काळ्य़ा पैशाला प्रतिबंध घालणे, या कारणासाठी केलेल्या नोटाबंदीतून कोणताच उद्देश सफल झाला नाही. ९९ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झाल्या. त्या कोठून आल्या, याचे उत्तर रिझर्व्ह बँकेसह सरकारनेही दिले पाहिजे. अर्जातून मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. त्यातून नोटाबंदीनंतरची माहिती जनतेपुढे येऊच द्यायची नाही, हा प्रयत्न सरकार, रिझर्व्ह बँकेकडून सुरू आहे. बँकेकडे आलेल्या नोटांपैकी १८ टक्के नकली आहेत. अनिवासी भारतीयांना ३१ मे पर्यंत मुदत दिल्याच्या काळात त्या जमा झालेल्या आहेत. ही माहिती पुढे येण्यासाठी सरकारने देशांतर्गत किती नोटा जमा झाल्या, अनिवासी भारतीयांनी किती नोटा जमा केल्या, त्यापैकी नकली नोटा किती, याचे विवरण द्यावे, त्यातून पुढे येणारी माहिती सरकारची इज्जत घालवणारी आहे. लोकांपुढे ही माहिती दिल्याने सरकार, बँकेची अब्रू जात असेल, तर दावा दाखल करावा, त्याची सुनावणी रोज होईल, अशी व्यवस्थाही करावी, असे आव्हानच अँड. आंबेडकर यांनी दिले. रोहींग्या संदर्भात काँग्रेस मधील मुस्लीम कार्यकर्ते सरकारला निवेदन देत आहेत मात्र देशातील घडणार्या घटनांबाबत ते मौन असतात यामुळे काँग्रेसी मुस्लीमाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे असा आरोप त्यांनी केला.
पाच कोटी लोकांचा रोजगार हिरावला!शहरी भागातील बांधकाम क्षेत्रात काम करणार्या लोकांचा रोजगार नोटाबंदीने हिरावला. त्यांना शहरे सोडावी लागली. त्यातून रोजगार हमी योजनेतील कामांवर मजुरांची संख्या वाढल्याची आकडेवारी असल्याचेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारची हुकूमशाहीकडे वाटचालसरकारच्या विरोधात बोलले, तर नोटीस देण्याचे प्रकार घडत आहेत. ही व्यवस्था हुकूमशाही निर्माण करणारी आहे. लोकशाही विरुद्ध विचार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही अँड. आंबेडकर यांनी दिला. सोबतच सरकार हिंदूंचे नव्हे, तर मनुवाद्यांचे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सेना, पोलीसदल नालायक आहे का ?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख भागवत, प्रधानमंत्री मोदी अत्याधुनिक शस्त्राचे पूजन का करतात, पोलीस, अर्धसैनिक बलांकडे नसलेली शस्त्रे आरएसएसकडे आली कोठून, ती बाळगण्याची परवानगी त्यांना कोणी दिली. या शस्त्रांतून कुणाला धाक दाखवायचा आहे. देशांतर्गत, सीमेवरच्या संरक्षण यंत्रणा नालायक असल्याचे आरएसएसला वाटते का, याचा खुलासाही आवश्यक असल्याचे अँड. आंबेडकर यावेळी म्हणाले.