अकाेला : भंडारा येथील दुर्दैवी घटना समाेर आल्यानंतर सरकारी वैद्यकीय आराेग्य यंत्रणांची उदासिनता समाेर आली आहे. इमारतीमध्ये अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा लावल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र(एनओसी)घेणे क्रमप्राप्त असताना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे ‘एनओसी’ नसल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. दुसरीकडे शहरातील खासगी १६० रुग्णालयांनी ‘एनओसी’घेतली आहे.
सुरत येथील खासगी शिकवणी वर्गाला आग लागल्याची घटना घडल्यानंतर झाेपेतून जागे झालेल्या काेचिंग क्लास संचालकांनी इमारतींमध्ये अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा लावली हाेती. आगीच्या घटनांमध्ये हकनाक निष्पाप बळी जात असतानाही सरकारी यंत्रणा बाेध घेत नसल्याचे समाेर आले आहे. भंडारा येथील रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेमुळे राज्यभरातील वैद्यकीय आराेग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. मनपाच्या अखत्यारित असलेल्या अग्निशमन विभागाकडून शासकीय व खासगी रुग्णालयांमधील अग्निराेधक उपकरणांबद्दल संबंधितांना सूचना दिली जाते. शासकीय कार्यालये, रुग्णालये, हाॅटेल, सिनेमागृह, रेस्टाॅरंट,बार यासह वाणिज्य संकुलांमध्ये अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा उभारल्यानंतर त्याची तपासणी करून अग्निशमन विभागाकडून ‘एनओसी’देण्यात येते. शहरात विविध ठिकाणी लहान माेठी १६० खासगी रुग्णालये असून संबंधितांना अग्निशमन विभागाकडून ‘एनओसी’देण्यात आली आहे. तर खुद्द सरकारी रुग्णालयांमध्येच अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा सक्षम नसल्यामुळे त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याची माहिती उजेडात आली आहे.
सरकारी रुग्णालयांची अनास्था
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयात अद्ययावत अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे यानिमित्ताने उजेडात आले आहे. संबंधित यंत्रणेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बाेट दाखवले जाते. या दाेन्ही यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव सर्वसामान्य रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारी रुग्णालयांद्वारे उभारण्यात आलेल्या नवीन इमारतींमध्ये अग्निराेधक सुरक्षा यंत्रणेचा अभाव आहे. सुरक्षा यंत्रणेची पाहणी केल्यानंतरच त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले जाईल. तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- मनीष कथले, अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग मनपा