‘भारत बंदला पाठिंबा द्या!’
अकाेला: शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले आहे, तसेच उद्या, ८ डिसेंबर राेजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती मनपा विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी व्यावसायिकांना केली आहे.
दशक्रियेनिमित्त स्मशानभूमीत वृक्षाराेपण
सिरसोली: स्व.इंदिराबाई मनोहरसा अनासाने यांचे २३ नाेव्हेंबर राेजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या दशक्रियेच्या दिवशी अनासाने परिवाराकडून सिरसोली येथील स्मशानभूमीत वड, पिंपळ, उंबर व इतर अनेक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिवारातील ज्येष्ठ नारायण अनासाने, शंकर अनासाने, पांडुरंग अनासाने यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
टॅक्सची माेहीम थंडावली
अकाेला: अकाेलेकरांकडे तब्बल १३८ काेटींचा मालमत्ता कर थकीत असून, त्याची वसुली करण्यासाठी मध्यंतरी महापालिका प्रशासनाने १४८ पथकांचे गठन केले हाेते. मागील काही दिवसांपासून मनपाकडून टॅक्स वसूलची माेहीम थंडावल्याचे चित्र असून, यामुळे नागिरकांनीसुद्धा कर जमा करण्यास हात आखडता घेतला आहे.
खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
अकाेला: निमवाडी लक्झरी बस स्थानक ते पाेलीस मुख्यालयापर्र्यंतच्या मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. लक्झरी बस स्थानकामुळे येथे प्रवाशांची माेठी रेलचेल दिसते. खड्ड्यांमुळे माेठा अपघात हाेण्याची शक्यता लक्षात घेता, या मार्गाची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शनाचा अभाव
अकाेला: खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातील पिकांवरही विविध किडराेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज असताना या विभागाकडून पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
वातावरणात बदल:साथ राेगांचा फैलाव
अकाेला: शहरात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, थंडीचा कडाका वाढला आहे. याचा परिणाम लहान मुले व वयाेवृद्ध नागरिकांच्या आराेग्यावर झाला आहे. शहरातील सर्व खासगी दवाखाने रुग्णसंख्येने खच्चून भरल्याचे चित्र आहे.
साेशल डिस्टन्सिंगला खाे
अकाेला: शहरात थंडीचा कडाका वाढत चालला असतानाच काही दिवसांपासून काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ हाेत असल्याचे समाेर आले आहे. काेराेनाचा प्रसार लक्षात घेतल्यानंतरही नागरिकांकडून साेशल डिस्टन्सिंगकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.
जय हिंद चौकात वाहतुकीचा खाेळंबा
अकोला: शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या जय हिंद चौकात साेमवारी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यालगत ऑटाेचालकांसह खाद्य पदार्थ, फळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली हाेती. अरूंद रस्त्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागताे.
डासांची पैदास वाढली!
अकोला: शहरातील नाले-गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले असून, डांसाच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या हिवताप विभागाने धुरळणी करण्याची गरज असताना या विभागाने झाेपेचे साेंग घेतल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय मार्गावर मातीचे ढीग
अकोला:शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण कार्र्य वेगाने सुरू असले तरी रस्त्याच्या खाेदकामात निघणाऱ्या मातीची शहराबाहेर विल्हेवाट न लावता रस्त्यालगत मातीचे ढीग साचत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर वाहनांमुळे दिवसभर मातीचा धुराळा उठत असल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.