अकोला: राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागू केल्यामुळे शेकडो पदे व्यपगत आणि अतिरिक्त होणार आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अटी व शर्ती घातल्यामुळे आता ही व्यपगत आणि अतिरिक्त झालेली पदे कायमस्वरूपी न भरता, मानधन तत्त्वावर भरण्याचा शासनाने गुरुवारी निर्णय घेतला आहे.राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी जानेवारी २0१९ मध्ये शासनाने सुधारित आकृतिबंध आणि निकष लागू केले. त्यामुळे शाळांमधील शेकडो पदे व्यपगत, अतिरिक्त होणार आहेत. पदे भरताना शिक्षण संस्था चालकांची मोठी अडचण होणार आहे. ही पदे कायमस्वरूपी न भरता मानधनावर भरावी आणि त्यासाठीही शासनाने अटी व शर्ती घातल्या आहेत. शिक्षण संचालकांची मंजुरी आणि मंजूर पदांचे दोन वेळा पटपडताळणी केल्यानंतर मान्य तुकड्यांमधील विद्यार्थी संख्येनुसारच पदांना मान्यता देण्यात येणार आहे. मंजूर पदसंख्येत कपात झाल्याने कर्मचारी अतिरिक्त ठरविताना व्यवस्थापन, प्रवर्गानुसार सेवाज्येष्ठतेच्या तत्त्वाचे पालन करावे लागणार आहे.एकाच व्यवस्थापनाच्या अनेक शाळा असल्यास, एकत्र सेवाज्येष्ठता यादीनुसारच तत्त्वाचे पालन करावे लागणार आहे. कर्मचारी अतिरिक्त ठरवून सेवा समाप्त करण्यासाठी पूर्वमान्यता घ्यावी लागणार आहे. अतिरिक्त कर्मचाºयांचे वेतन, भत्ते, त्यांचे समावेशन होईपर्यंत मूळ शाळेतूनच करावे, यासोबतच इतरही काही अटी व शर्ती घातल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)