अकोला: मोर्णा धरणातून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोर्णा ते महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकणे आणि खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत चोहोट्टा बाजार ते घुसरपर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी, ३२ कोटी ६९ लाख ५५ हजार रु पयांच्या दोन पाणीपुरवठा योजनांचा शुक्रवारी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणासह इतर धरणांमध्येही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, मोर्णा धरणा तून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने मोर्णा धरणा पासून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेसाठी २७ कोटी २0 लाख ११ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत तयार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातल्या ६४ गावांच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चोहोट्टा बाजार ते घुसरदरम्यान ३१५ मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकणे, पाणी शुद्ध करण्याचे पंप आणि ह्यव्हीटीह्ण पंप बसविण्याच्या कामासाठी ५ कोटी ४९ लाख ४४ हजार ७00 रुपयांच्या योजनेचा प्रस्तावदेखील मजीप्राकडून तयार करण्यात आला. अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन योजनांच्या कामांसाठी एकूण ३२ कोटी ६९ लाख ५५ हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्ताव मजीप्राकडून जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला.
दोन पाणीपुरवठा योजनांसाठी ३२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे!
By admin | Published: December 08, 2014 1:16 AM