संतोष येलकर / अकोला : शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या शासकीय निवासस्थानांमध्ये गुरे-ढोरे बांधली जात आहेत. गुरे-ढोरे पाळण्यासाठी शहरातील शासकीय निवासस्थानांसह शासकीय जमिनीचा गैरवापर करण्यात येत असल्याने, शासकीय निवासस्थाने गुरांचे गोठे बनल्याची बाब 'लोकमत'ने गुरुवारी केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये चव्हाट्यावर आली आहे. विविध विभागांतर्गत शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासाची व्यवस्था म्हणून शहरात विविध ठिकाणी शासकीय निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. निवासाची व्यवस्था म्हणून अधिकारी व कर्मचार्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांचा वापर नियमानुसार निवासाकरिता होणे अपेक्षित असून, शासकीय निवासस्थान किंवा परिसराचा वापर गुरे-ढोरे पाळण्यासाठी करता येत नाही. परंतु, या नियमाची पायमल्ली करीत, शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयमागील परिसरात काही शासकीय निवासस्थानांच्या परिसरात गोठे उभारून, गुरे-ढोरे पाळली जात आहेत. तसेच क्रीडा संकुल परिसरातील मोकळ्या शासकीय जमिनीवर आणि दुरवस्था झालेल्या महसूल मंडळ अधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय जमिनीचा वापर खुलेआम गाय-म्हैस बांधण्यासाठी करण्यात येत आहे. शहरात शासकीय निवासस्थाने परिसर आणि शासकीय जमिनीचा गुरे -ढोरे बांधण्यासाठी गैरवापर होत असून, शासकीय निवासस्थानांना गोठय़ांचे स्वरूप आल्याची बाब ह्यलोकमतह्णने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये समोर आली.
शासकीय निवासस्थानांच्या आवारात चक्क गोठे!
By admin | Published: July 24, 2015 11:43 PM