अकोला - नेमकं काय करायचंय याचा उद्देशही स्पष्टपणे केंद्र सरकारकडे नव्हता. केवळ, आम्ही हल्ला करतो हेच दाखवायचा प्रयत्न असेल तर त्याची गरज नव्हती. कारण, यापूर्वीही ते दाखवून दिलंय, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तसेच या एअर स्ट्राईकचे पुरावे द्या, फोटोग्राफ रिलीज करा, अशी मागणीही आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत केली.
बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करतांना हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या वक्तव्याचा दाखल आंबेडकर यांनी दिला. अशा हवाई हल्ल्यांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले, याची मोजदाद भारतीय हवाई दल करीत नाही, असे विधान एअर मार्शल धनोआ यांनी केले. हे विधान म्हणजे केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. वायुसेनेने आपले काम केले, आता सरकारने या हल्यासंदर्भात जबाबदारीने पुरावे देण्याची गरज आहे, असे आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
पुलवामा घटनेनंतर जग भारताच्या पाठिशी राहिले, त्यामुळे लष्करी कारवाईचेही समर्थन जगाने केले. आता, या कारवाईवरच प्रश्न उपस्थित राहत असतील तर ते देशाच्या प्रतिष्ठेसाठी चुकीचे आहे. सरकारला वायुसेनेची प्रतिष्ठा राखण्यात अपयश आले असून जगासमोर आपली प्रतिम कणखरपणे उमटवायची असेल तर एअर स्टाईकेचे पुरावे दिले पाहिजेत, अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केली. एअर स्ट्राईक करताना त्याचे फोटोग्राफ काढले जातात. त्यामुळे सरकारने ते फोटोग्राफ रिलीज करून पुरावे द्यावेत, असेही आंबेडकर म्हणाले.