आशिष गावंडे/ अकाेला
शहरावर काेराेनाचे संकट घाेंघावत असतानाच दुसरीकडे महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. मागील काही महिन्यांपासून शिवसेनेने आक्रमक भूमिका स्वीकारत सत्ताधारी भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. त्याचा परिणाम म्हणून की काय, ऐन सरत्या वर्षात २४ डिसेंबर राेजी राज्य शासनाने तब्बल २० ठराव विखंडीत करीत सत्ताधारी भाजपला वेसण घातल्याचे दिसून आले. एकूणच, वर्षभराच्या कालावधीत मनपात सत्ताधारी व विराेधकांमध्ये चांगलेच घमासान रंगल्याचे पाहावयास मिळाले.
* शिवसेना,काॅंग्रेसची एकजूट
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याचा परिणाम मनपाच्या राजकारणावर झाला आहे. एकजुटीशिवाय सत्ताधारी भाजपसमाेर निभाव लागत नसल्याची जाणीव झाल्यामुळे शिवसेना व काँग्रेसने एकत्र येत भाजपला जेरीस आणल्याचे दिसून आले.
* सत्ताधारी ताेंडघशी
मनपाची सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीमध्ये नियमांचे तंताेतंत पालन करूनच निर्णय घेतले जात असल्याचा दावा करणारा सत्तापक्ष भाजप विभागीय आयुक्तांच्या चाैकशी अहवालात ताेंडघशी पडला. सभांमधील कामकाज नियमानुसार चालत नसल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांनी शासनाकडे सादर केला.
* काेराेना काळात नगरसेवकांचे निधन
काेराेना काळात माजी लाेकप्रतिनीधी, नगरसेवक,नगरसेविकांचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. माजी आ. डाॅ. जगन्नाथ ढाेणे, प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप नगरसेविका नंदाताई पाटील, प्रभाग ३ मधील वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका ॲड. धनश्री देव, प्रभाग क्रमांक ४ मधील भाजप नगरसेवक संताेष शेगाेकार यांनी अचानक ‘एक्झिट’केल्याने अकाेलेकरांना धक्का बसला.
* तीन वर्षांतील कामकाजाची चाैकशी
मागील तीन वर्षांच्या कालावधीत सर्वसाधारण सभा, स्थायी समितीमध्ये पार पडलेल्या कामकाजाची चाैकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश २४ डिसेंबर राेजी राज्य शासनाने विभागीय आयुक्त अमरावती यांना जारी केला. सरत्या वर्षात हा सत्ताधारी भाजपसाठी माेठा धक्का मानला जात आहे.
* फाेर-जी केबलचा घाेळ उघडकीस
मनपाच्या परवानगीशिवाय शहरात तब्बल ३९ किलाेमीटर अंतराचे भूमिगत फाेर-जी केबलचे जाळे अंथरले जात असल्याचा प्रकार ‘लाेकमत’ने उजेडात आणला. याप्रकरणाची केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धाेत्रे यांनी गंभीर दखल घेत महापालिकेला कारवाईचे निर्देश दिले. मनपाच्या कारवाईत रिलायन्स जिओ इन्फाेटेक कंपनीला २४ काेटींचा दंड जमा करावा लागला.
* सुविधा पुरविण्यात प्रशासन ‘फेल’
शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख बाजारपेठ, प्रभागात धुळीने माखलेले रस्ते, घाणीने तुडूंब साचलेले नाले, गटारांचे चित्र कायम आहे. अकाेलेकरांना मूलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासन ‘फेल’ठरले आहे.
* ‘आयुक्त आपल्या दारी’ माेहीम गुंडाळली
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘आयुक्त आपल्या दारी’ ही माेहीम सुरू केली हाेती. तत्कालीन उपायुक्तांवर ही जबाबदारी साेपवली हाेती. अवघ्या दहा ते बारा दिवसांत ही माेहीम गुंडाळण्यात आली.
* नगररचना विभागावर भ्रष्टाचाराचे आराेप
‘पीएम’आवास याेजनेतील लाभार्थी असाे वा घर बांधकामाच्या परवानगीसाठी नगररचना विभागाकडून झुलवत ठेवले जात असल्याचे दिसून आले. या विभागातील कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आराेप झाल्यानंतर प्रशासनाने त्यांची उचलबांगडी केली.
*‘अमृत’याेजना अधांतरी
‘अमृत’याेजनेंतर्गत भूमिगत गटार याेजना, पाणीपुरवठा याेजनेला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर उपलब्ध पाण्याचे काय करणार, याचा आराखडा तयार नाही. दुसऱ्या टप्प्यातील कामाचेही नियाेजन नाही.
* शिक्षक, आशा सेविकांचे कार्य उल्लेखनीय
काेराेना काळात एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत मनपाचे शिक्षक, शिक्षिका, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय विभागातील आशा सेविकांनी बाधित रुग्णांना शाेधण्यासाठी रात्रंदिवस न थकता प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे काेराेनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात आले.