संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निवडणूक निकालानंतर ३0 दिवसात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना, जिल्हय़ातील मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या, मात्र विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांवर पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे.जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल गत ९ ऑक्टोबर २0१७ रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर ३0 दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. नियमानुसार विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येते. त्यानुषंगाने विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना देण्यात आला होता. त्यानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील ६४ आणि पातूर तालुक्यातील ४२ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर केला नसल्याचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाला प्राप्त झाला. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर केला नसल्याने, संबंधित उमेदवारांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरविण्याच्या कारवाईसाठी उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या, मात्र विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्या मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
पाच तालुक्यातील उमेदवारांचा अहवाल अप्राप्त - ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्या मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यांतील उमेदवारांचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आले. - अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी व तेल्हारा या पाच तालुक्यातील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून अद्यापही सादर करण्यात आला नाही. - या पाच तालुक्यातील उमेदवारांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.