अकोला, दि. १३ : शहरालगतच्या २४ गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश झाल्यानंतर १५ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींमधील दस्तावेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने जवळपास पूर्ण केली आहे. त्यामध्ये विभागनिहाय माहिती व दस्तावेजाचा समावेश असून त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी उद्या (बुधवार) विभाग प्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.महापालिका क्षेत्राची ३0 ऑगस्ट रोजी हद्दवाढ होऊन शहरात २४ ग्रामपंचायतींचा समावेश झाला. यापैकी १५ ग्रामपंचायतींमधील दस्तावेज ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला मनपा प्रशासनाने सुरुवात केली. आयुक्त अजय लहाने यांनी ही जबाबदारी मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त सुरेश सोळसे, लेखाधिकारी दिनकर बावस्कर यांच्यावर सोपवली. उपायुक्त सोळसे यांनी विभागनिहाय अधिकारी-कर्मचार्यांच्या पथकाचे गठन केले. यामध्ये लेखा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पाणीपुरवठा विभाग, मालमत्ता कर वसुली विभाग, बाजार-परवाना विभाग, जन्म-मृत्यू विभाग, विवाह नोंदणी विभाग, नगररचना विभागाचा समावेश आहे. संबंधित विभागाने ग्रामपंचायतींमधील दस्तावेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून आज रोजी अंतिम टप्प्यात आहे. अधिकारी-कर्मचार्यांनी जमा केलेले दस्तावेज व माहितीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मुख्य सभागृहात विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
ग्रा.पं. चे दस्तावेज ताब्यात; आयुक्त घेणार आढावा!
By admin | Published: September 14, 2016 1:57 AM