अकोला: महापालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे नोंद ठेवण्यात कसूर करणाºया मोटार वाहन विभागाच्या भोंगळ कारभाराला आणि वाहन चालकांच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घंटागाड्यांना ‘जीपीएस’प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडे प्राप्त निविदा अर्जांवर उद्या शुक्रवारी स्थायी समितीमध्ये निर्णय घेतला जाईल. गत तीन वर्षांपासून प्रशासनाच्या निविदेला सत्ताधारी भाजपाने झुलवित ठेवल्याने स्थायी समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अकोलेकरांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल १२५ घंटागाडीची सोय केली आहे. या वाहनाद्वारे शहरातील हॉस्पिटल, हॉटेल, खानावळी, दुकाने, बाजारपेठेतून कचरा जमा करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी मनपाने वाहन चालकांच्या नियुक्त्या केल्या. सकाळी ७ वाजतापासून ते दुपारी २ वाजतापर्यंत या वाहनाद्वारे ओला व सुका कचरा जमा करून त्याची नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. दुपारी २ नंतर ही वाहने मोटार वाहन विभागात जमा करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्याची परिस्थिती आहे. २०१६ मध्ये या वाहनांवर नियुक्त झालेल्या चालकांच्या मनमानी कारभारात वाढ झाली असून, चक्क रात्री ११ वाजतापर्यंत शहरातील हॉटेल, खानावळींमधील अन्न जमा करून त्याची विल्हेवाट लावताना अनेक वाहने फिरताना आढळून येतात. अर्थात, महापालिकेच्या इंधनाचा गैरवापर करीत वाहन चालक स्वत:च्या तुंबड्या भरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही वाहने मोटार वाहन विभागात जमा न करता थेट वाहन चालकांच्या घरी उभी केली जातात. हा प्रकार कमी म्हणून की काय, उघड्यावर बेवारस स्थितीत सोडून वाहन चालक पळ काढत असल्याचे अनेकदा समोर आले. वाहन चालकांच्या मनमानीला चाप लावण्याच्या उद्देशातून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी कचरा जमा करणाºया वाहनांना ‘जीपीएस’प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला आहे.
मोटार वाहन विभागावर नाराजीमोटार वाहन विभागाच्या कामकाजावर आयुक्त संजय कापडणीस यांची नाराजी असल्याची माहिती आहे. शहरातील कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्या, उघड्यावरील कचरा उचलण्यासाठी मनपाच्या मालकीचे व खासगी तत्त्वावर लावण्यात आलेले ट्रॅक्टर असा मोठा लवाजमा असताना शहरात कचºयाची समस्या दिसून येते.
कचरा जमा केल्यानंतर संबंधित वाहन मोटार वाहन विभागात जमा करणे भाग आहे. मनपाच्या इंधनाचा व वाहनांचा खासगी कामांसाठी होणारा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठीच ‘जीपीएस’प्रणाली कार्यान्वित केली जाईल.-संजय कापडणीस, आयुक्त मनपा.