अकोला - रामदास पेठ परिसरातील दामले चौकातून पोत्यांमध्ये नेण्यात येत असलेला बनावट शाम्पूचा साठा रामदास पेठ पोलिसांनी जप्त केला. शाम्पूचा हा साठा विना लेबल व लेबलचा असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलीगड जिल्हय़ातील रहिवासी असलेला उस्मान अख्तर अली हा विविध कंपन्यांचे विना लेबल व लेबलचे बनावट शाम्पू घेऊन अकोल्यात विक्री करीत असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली. रामदास पेठ पोलिसांनी उस्मान अलीवर पाळत ठेवून त्याला बनावट शाम्पूची खरेदी-विक्री करीत असताना दामले चौकातील एका दुकानातून अटक केली. उस्मान अली याच्याकडून तीन पोते विविध कंपन्यांची बनावट शाम्पू जप्त केली आहे. सनसिल्क, चिक, डव्ह यांसह अनेक कंपन्यांचे बनावट शाम्पू उस्मान अली विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांची बनावट शाम्पू कोणत्या ठिकाणी बनविण्यात येत होती, त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. बनावट शाम्पू बनविणार्यांवरही फौजदारी कारवाई करण्यासाठी रामदास पेठ पोलीस उस्मान अली याची कसून चौकशी करीत असून, त्याच्या चौकशीतून शाम्पू बनविणार्यांची नावे लवकरच समोर येणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी गजानन घिरके यांच्या तक्रारीवरून उस्मान अलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दामले चौकातून बनावट शाम्पूचा साठा हस्तगत
By admin | Published: June 25, 2016 2:11 AM