अकोला : शासनाने भरड धान्याच्या खरेदीसाठीची मुदत दोन वेळा वाढविली; परंतु शासकीय तूर खरेदी अद्याप सुरू न केल्याने शेतकºयांचा शासनाप्रती नाराजी सूर आहे.शासनाने ज्वारी, मका, बाजरी आदी भरड धान्य खरेदी केंद्र तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेली आहेत. विदर्भात भरड धान्यात प्रामुख्याने ज्वारी पीक घेतले जात होते. तथापि, वन्य प्राण्यांचा त्रास आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे ज्वारीची पेरणी लक्षणीय घटली. त्यामुळे येथे ज्वारीचे उत्पादनही कमी आहे. मका व बाजरीचे क्षेत्रही अत्यंत कमी आहे. या भागात तूर पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू आहे; पण अद्याप तुरीचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. परिणामी, शेतकºयांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाºयांना तूर विकावी लागत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी तुरीचे दर प्रतिक्ंिवटल ४,४०० ते सरासरी पाच हजार रुपयांपर्यंत होते. म्हणजेच शेतकºयांना आधारभूत किमतीपेक्षा १,२७५ ते ६७५ रुपये कमी दराने तूर विकावी लागत आहे.महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने संबंधित सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते; परंतु अद्याप याबाबत सकारात्मक स्थिती नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात संबंधित विभागाशी संपर्क केला असता, कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचे प्रस्ताव फेडरेशनच्या प्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आले असून, २ फेब्रुवारीपासून आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचा दुजोरा जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी दिला.