अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. त्यामध्ये एका जागेसाठी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिलेल्या ३३५ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित झाली आहे.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत होती. या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ३३५ जागांवर प्रत्येकी एकच उमेदवारांचा अर्ज राहिल्याने या उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्यपदी अविरोध निवड झाल्याचे निश्चित झाले आहे. संबंधित सदस्यांची अविरोध निवड झालेल्या सदस्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असून, आयोगाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात येणार आहे, असे निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
१० ग्रामपंचायती अविरोध
जिल्ह्यात १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्व जागांवर प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज कायम राहिल्याने या ग्रामपंचायतींच्या ७४ सदस्यांची अविरोध निवड निश्चित झाली. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील २, अकोट तालुक्यातील ३, मूर्तिजापूर तालुक्यातील २, बाळापूर तालुक्यातील २ व बार्शिटाकळी तालुक्यातील १ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.