लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. रात्री १० वाजेच्या अंदाजानुसार जवळपास ३,८१० उमेदवारी अर्ज दाखल झाले.
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली असून, शेवटच्या दिवशी ३० डिसेंबर रोजी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार व समर्थकांची एकच गर्दी झाली होती. उमेदवारी अर्जापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून शेवटच्या दिवशी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार अनेक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केले. ग्रामपंचायत निवडणूक आणि काेराेनाच्या प्रादुर्भावाची चिंता अशी दुहेरी कसरत करत प्रशासनाला ही निवडणूक पार पाडावी लागत आहे तसेच उमेदवारांनाही मतदारांशी संपर्क करताना काळजी घ्यावी लागेल आहे अर्ज भरताना काेराेना नियमांचे कुठेही पालन झालेले दिसले नाही त्यामुळे काेराेनाच्या प्रसाराची चिंता आहेच.
१५ जानेवारी रोजी फैसला
२२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये चार लाख ८६ हजार २९१ मतदार ग्रामपंचायतींची सत्ता ठरविणार आहेत. जिल्ह्यात ७७३ प्रभाग असून, २०५५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये रंगत वाढली आहे.