सोडतीद्वारे गत आठवड्यात जातीनिहाय आरक्षित करण्यात आलेल्या सरपंच पदाचे आरक्षण शासनाने रद्द केले आहे. सध्या वाॅर्डनिहाय आरक्षित व अनारक्षित जागेवर सदस्यपदासाठी २३ ग्रामपंचायतींमध्ये पातूर तालुक्यात निवडणूक होत आहे.
निवडणुकीसाठी नामनिर्देशन २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत २५,२६,२७ डिसेंबरच्या सार्वजनिक सुट्ट्या वगळून नामनिर्देशन पत्र सदस्यपदासाठी नागरिकांना दाखल करता येतील. त्यासाठी २३ गावांतील नागरिकांनी उमेदवारी अर्जासोबत लागणारे आवश्यक दस्त लेख तयार करण्यासाठी एकच झुंबड पातूर तहसील कार्यालयात केल्याचे चित्र गुरुवारी दिवसभर पाहायला मिळाले.
गावागावांतील अनेक पॅनेल प्रमुख पक्षप्रमुख तथा जुनेजाणते वयोवृद्ध राजकीय आराखडे तयार करीत असताना ‘चाय पे चर्चा’ करीत असताना दिसून आले. दस्तलेखकांकडे एकच झुंबड उडाली आहे. सध्या काेराेना काळ लक्षात घेता कोणीही आपल्या चेहऱ्यावर मास्क लावत नाही आणि शारीरिक अंतरही पाळत नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेमधील कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थंडीमुळे तालुक्यात तापमानात घट झाली, मात्र गावागावांत राजकारणाचा फड रंगला आहे.
..............................
संवेदनशील गावांवर पाेलिसांची नजर
तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्र असलेल्या गावांवर पाेलिसांची नजर राहणार आहे. चान्नी पो. स्टे.अंतर्गत चरणगाव २, आलेगाव ७, सस्ती ४, पातूर पोलीस स्टेशनअंतर्गत खानापूर ३, बेलुरा बुद्रूक ३, बेलुरा खुर्द ३, दिग्रस खुर्द ३, तांदळी बुद्रूक ३, पास्टुल ३, शिर्ला ६, मलकापूर ३, भंडारज खुर्द ३, देऊळगाव तीन आदी गावांतील केंद्रांत समावेश आहे. ही गावे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.