अकोला: जिल्हय़ातील २२0 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम २३ जून रोजी जाहीर झाला असून, ४ ऑगस्ट रोजी मतदान, तर ६ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान संपुष्टात येत असल्याने तसेच विभाजनामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला. जिल्हय़ात २२0 ग्रामपंचायती व ४८ ग्रामपंचायत सदस्यांसाठी पोट निवडणूक होत आहे. गत काही दिवसांपासून ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची ग्रामस्थ व विविध पक्षांचे नेते आतुरतेने वाट पाहत होते. २३ जून रोजी अखेरीस ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. राज्यात दुसर्या टप्प्यात अकोला जिल्हय़ातील ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार आहे. बुधवारपासून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हय़ात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी व खरीप हंगामात निवडणुकीचा फड रंगणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये १३ ते २0 जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करण्याची तारीख आहे. २१ जुलै रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी निवडणूक अधिकार्यांकडून करण्यात येणार आहे. २३ जुलै रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २३ जुलै रोजीच निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३0 वाजतापासून तर सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ६ ऑगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा निकाल ७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला
By admin | Published: June 24, 2015 2:03 AM