अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीची विशेष मोहीम २४ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला.ग्रामपंचायतींचे अभिलेखे नमुना १ ते ३३ ची तपासणी करण्यासाठी २४ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दप्तर तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता सरपंच आणि सरपंचांकडून ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसभेत ग्रामपंचायतींच्या दप्तराचे वाचन करण्यात येणार आहे. ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत दप्तराची पाहणी करणे, प्लास्टिकमुक्त परिसर करणे, प्लास्टिकमुक्त परिसर करण्यासाठी शपथ घेणे व प्लास्टिक गोळा करण्याचा उपक्रमही ग्रामपंचायत दप्तर तपासणीत राबविण्यात येणार आहे.