संतोष येलकर.
अकोला : ‘महानेट’ अंतर्गत जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना लवकरच ‘महानेट’ची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विविध कामांसाठी अतिजलद (हायस्पीड) इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या ‘महानेट’ प्रकल्पांतर्गत यापूर्वी अकोट व बाळापूर तालुक्यातील १४७ ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर केबल जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ‘महानेट’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींमध्ये ‘हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी’ उपलब्ध करण्याकरिता ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान (महाआयटी) विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘महानेट’ प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतींना हायस्पीड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्यासाठी केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हयातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना ‘महानेट’ अंतर्गत इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मार्चपर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्याचे ‘टार्गेट’!जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ‘महानेट’अंतर्गत हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्ही उपलब्ध करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना येत्या मार्च २०२२ पर्यंत ‘महानेट’ अंतर्गत हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) निश्चित करण्यात आले आहे.
अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्रांनाही मिळणार ‘कनेक्टिव्हिटी’!
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ‘महानेट’ अंतर्गत हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीअंतर्गत अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, तसेच गावांतील विविध शासकीय कार्यालयांनाही हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या!
तालुका ग्रा. पं.
अकोला ९९
अकोट ८५
बाळापूर ६६
बार्शिटाकळी ८२
मूर्तिजापूर ८६
पातूर ५६
तेल्हारा ६२
......................................................
एकूण ५३६
‘महानेट’अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करून ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी.