संतोष येलकर
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ आणि कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीस अधीन राहून येत्या २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या अवर सचिवांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २३ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे दिला. त्यानुसार जिल्ह्यात ‘ऑफलाइन’ पद्धतीने ग्रामसभा घेण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दोन दिवसांत जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ७ अन्वये दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येतात. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा आयोजित करायच्या की नाही, यासंदर्भात राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून राज्य शासनाकडे विचारणा करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या स्थितीत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ आणि कोरोनाविषयक शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून २ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश राज्य शासनाचे अवर सचिव सुहास जाधवर यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला. त्यानुसार जिल्ह्यात २ ऑक्टोबर रोजी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ऑफलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्यात येणार असून, ग्रामसभा आयोजित करण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत.
...........................................
जिल्ह्यात तालुकानिहाय अशी
आहे ग्रामपंचायतींची संख्या!
तालुका ग्रा.पं.
अकोला ९९
अकोट ८५
बाळापूर ६६
बार्शीटाकळी ८२
मूर्तिजापूर ८६
पातूर ५६
तेल्हारा ६२
..............................................
एकूण ५३६
......................................................
कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे पत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २ ऑक्टोबर रोजी कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ऑफलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. ग्रामसभा आयोजित करण्यासंदर्भात जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना येत्या दोन दिवसांत पत्राद्वारे सूचना देण्यात येणार आहेत.
-सौरभ कटियार,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.