संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी जयंतीदिनी (२ ऑक्टोबर) सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने शासनामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती ग्रामसभांमधून ग्रामस्थांना देण्यासाठी ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे ग्राम विकासमंत्र्यांनी योजनांबाबत दिलेल्या संदेशाचे वाचन ग्रामसभांमध्ये होणार आहे. ग्राम विकासामध्ये ग्रामपंचायतींची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. ७३ व्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामीण विकासात ग्रामपंचायतींची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी गावानेच पुढाकार घेणे आवश्यक असून, लोकांचा पुढाकार, शासनाचा सहभाग, या संकल्पनेनुसार गावाच्या विकासाकरिता ग्राम विकास, पर्यावरण, पाणी स्वच्छता, आरोग्य इत्यादी क्षेत्रात ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या पृष्ठभूमिवर २ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार्या ग्रामसभांमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या अंमलबजावणीबाबत ग्रामसभेत ठराव घेणे आवश्यक आहे. तसेच शासनामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती ग्रामसभांच्या माध्यमातून ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांना पत्र लिहिले आहे. ग्राम विकासमंत्र्यांच्या या पत्राचे वाचन ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहे. यासंबंधी शासनाच्या ग्राम विकास विभागाचे उपसचिव गिरीश भालेराव यांच्यामार्फत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना २८ सप्टेंबर रोजीच्या पत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामसभेत या योजनांची दिली जाणार माहिती! ग्राम विकासमंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या पत्रानुसार ग्रामसभांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत ह्यसुंदर खेडं ह्ण निर्माण करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांची नोंदणी करून जॉबकार्डचे वाटप आणि ग्रामपंचायत स्तरावर ४0 प्रकारच्या कामांचे नियोजन, ग्रामपंचायत विकास आराखडा, ग्रामपंचायतींच्या विकासामध्ये महिलांचे योगदान, कुपोषण निर्मूलनाच्या योजना, मुलींची गर्भाशयात हत्या होणार नाही व मुलीला शिक्षण दिले जाईल, यासाठी जनजागृती, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची आवश्यकता, ग्रामपंचायत स्तरावर दिले जाणारे विविध प्रकारचे १३ दाखले व अटल पेन्शन योजनेंतर्गत लाभार्थींना द्यावयाचा लाभ इत्यादी योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे.
ग्रामसभांमध्ये होणार ग्राम विकासमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन
By admin | Published: October 01, 2015 11:49 PM