अकोला : केंद्र शासनाने खरेदी केलेल्या हरभरा, उडिदाची भरडाई करून डाळ स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप केली जाणार आहे. अंत्योदय, प्राधान्य गटातील प्रतिशिधापत्रिकेवर दोन किलो डाळ प्रतिकिलो ३५ रुपयांप्रमाणे मिळणार आहे. मिलरची नियुक्ती आणि भरडाई झाल्यानंतर ही डाळ उपलब्ध होणार आहे.राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार केंद्र शासनाने खरेदी केलेला हरभरा, उडीद उपलब्ध करून दिला आहे. नाफेडच्या गोदामात साठा असलेल्या हरभरा, उडिदाची भरडाई करण्यासाठी शासन मिलरची नियुक्ती करणार आहे. मिलरने गोदामातून धान्याची उचल करणे, भरडाई करणे, डाळीचे एक किलोमध्ये पॅकिंग करणे, त्यानंतर राज्य शासनाच्या गोदामापर्यंत पोहोचून देण्याची जबाबदारी मिलरची राहणार आहे.रास्त भाव दुकानदारांच्या मागणीनुसार डाळीचा पुरवठा केला जाणार आहे. दुकानदारांना डाळ विक्रीसाठी प्रतिकिलो १.५० पैसे मार्जिन मिळणार आहे. अंत्योदय योजना, प्राधान्य गटातील लाभार्थींना प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका एकूण दोन किलो डाळ प्रतिकिलो ३५ रुपयांप्रमाणे दिली जाईल.
लाभार्थींच्या माथी तिसऱ्या दर्जाची डाळशासनाने तूर डाळ सवलतीच्या दरात वाटप करण्यासाठी हीच पद्धत आधी सुरू केली; मात्र लाभार्थींना वाटप होणारी डाळ तिसºया दर्जाची असल्याने त्या डाळीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाकडून खरेदी झालेल्या ‘एफएक्यू’ धान्याची डाळ तिसºया दर्जाची का मिळत आहे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यातून मिलर, कंत्राटदारांना मलिदा लाटण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आता वाढत आहे. तोच आता उडीद, हरभरा डाळीसंदर्भातही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.