अकोला, दि. ५- शासनाने शेतकर्यांना अनुदानावर दिलेल्या बियाण्यांचे वाटप पात्र लाभार्थींंना न होता महाबीजचे वितरक, कषी सेवा केंद्र संचालक आणि दलालांनीच घेतले. त्यातून लाखो रुपयांचा मलिदा लाटला. याबाबत ओरड झाल्यानंतर आता अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून गावपातळीवर ज्यांच्या नावे हरभरा बियाणे वाटप झाले, त्यांची चौकशी केली जाणार आहे, तर विक्रेत्यांचीही चौकशी होत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा बियाण्याला शासनाने अनुदान दिले. २४ सप्टेंबरपासून बाजारात पुरवठा झालेल्या हरभरा बियाण्यांचा ६ ऑक्टोबरपर्यंंत कुठलाच हिशेब नव्हता. याच काळात बियाण्यांची खुल्या बाजारात चढय़ा भावाने विक्री काही केंद्र संचालक, वितरकांनी केला. शेतकर्यांची ओरड झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी चौकशी केली. त्या अहवालानुसार प्राथमिक चौकशीसाठी विभागीय तांत्रिक अधिकारी डॉ. चेडे यांच्या पथकाने चौकशी केली. त्याचवेळी अधीक्षक कृषी अधिकार्यांनी स्वतंत्रपणे शंभर टक्के चौकशी करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार ज्या शेतकर्यांच्या नावे हरभरा बियाणे देण्यात आले, त्यानेच उचल केले का, शेतात पेरणी केली का, कोणते टॅग आणि बॅच क्रमांकाचे बियाणे होते, त्याची देयक पावतीही तपासली जाणार आहे. गावपातळीवर कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ही चौकशी करणार आहेत, तर महाबीजचे वितरक, कृषी सेवा केंद्रांची चौकशी जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्यासह जिल्हय़ातील तीन उपविभागीय कृषी अधिकारी करतील, असे आदेश देण्यात आले आहेत. त्या चौकशीतून या घोटाळ्यात बदमाशी करणार्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
हरभरा लाभार्थींंची गावपातळीवर चौकशी
By admin | Published: January 06, 2017 2:41 AM