अकोला: जिल्हा परिषद शाळांची वीज बिल देयके शासनाने भरण्याबाबत शिक्षक परिषदेची आग्रही मागणी मान्य करून तसे परिपत्रक काढले असून, १४ व्या वित्त आयोगातून विद्युत देयके संबंधित ग्रामपंचायतींद्वारे भरण्याचा आदेश दिला असून, तशी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाची ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्यासोबत २४ जुलै रोजी विधान भवन मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत गुप्ता यांनी माहिती दिली. यासोबत बैठकीत विविध शैक्षणिक समस्यांवर चर्चा करून त्या निकाली काढण्यात आल्या.राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वात राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्यासोबत विधान भवन मुंबई येथे प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करताना शाळांची सुगम व दुर्गम अशी निश्चिती करण्यात आली होती. ज्या शाळा दुर्गम असून, सुगम दाखविल्या गेल्या आहेत. त्या शाळांची फेरपडताळणी करून सुगम-दुर्गम अशी फेरनिश्चिती करण्याचा आदेश दिले. येत्या काही दिवसांत राज्यभरात पवित्र शिक्षक भरती पोर्टलमधून नवीन शिक्षकांच्या नेमणुका होणार आहेत. माहे जून २0१९ मध्ये ज्यांच्या रँडममधून व समुदेशनद्वारे बदल्या झाल्या आहेत. त्या महिला शिक्षकांना समानीकरणाच्या शाळा पुन्हा खुल्या करून समुपदेशनाची पुन्हा एकदा संधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. १ नोव्हेंबर २00५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना डीसीपीएस पेन्शन योजना लागू केलेली असूनही शिक्षकांच्या वेतनातून दर माहे जे अंशदान कपात होते, त्याचा सर्व जिल्हा परिषदेने शिक्षकांना जमा रकमेचा हिशेब देण्याबाबत आदेश पारित केला. बैठकीला राज्य कार्यवाह सुधाकर मस्के, राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, सुनील पाटील, राज्य संघटन मंत्री सुरेश दंडवते, राज्य उपाध्यक्ष प्रकाश चतरकर, विजय खांडके, अविनाश तालपल्लीवार, राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे, प्रकाश चुनारकर, राजेंद्र चौधरी, शांताराम घुले, डॉ. सतपाल सोवळे, राज्य महिला प्रतिनिधी वंदना बोर्डे, अप्सरा इपतेखारी कोषाध्यक्ष संजय पगार, राज्य कार्याध्यक्ष रायगड जिल्हाध्यक्ष संजय निजापकर व राज्य प्रसिद्धिप्रमुख रविकिरण पालवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)