लोणार (जि. बुलडाणा): वाटणीपत्राद्वारे नावे करून दिलेल्या जागेची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद करून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना गंधारी येथील ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. तालुक्यातील गंधारी येथील अँड. अशोक दिनकर राऊत यांचे आजोबा दिवंगत ज्ञानुजी आनंदा राऊत यांनी त्यांच्या मालकीची बांधकाम केलेली व मोकळी जागा अँड. अशोक राऊत यांचे वडील दिनकर राऊत यांच्या नावे केली होती. ही वाटणी ग्रामपंचायतच्या रेकार्डवर घेण्यासाठी तसेच त्यांच्या नावाने गाव नमुना ८-अ चा उतारा देण्याकरिता ग्रामसेवक प्रवीण धोंगडे याने पाच हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार अँड. अशोक राऊत यांनी २७ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे केली होती. राऊत यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक्षक महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ जून रोजी सापळा रचण्यात आला. यामध्ये ग्रामसेवक प्रवीण धोंगडे अलगद सापडला आणि अशोक राऊत यांच्याकडून चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. ग्रामसेवक धोंगडे याच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, कॉन्स्टेबल विष्णू नेवरे, श्याम भांगे, संजय शेळके, प्रदीप गडाख, विजय वारुळे हे सहभागी होते.
पाच हजाराची लाच घेताना ग्रामसेवकास अटक
By admin | Published: June 10, 2016 2:10 AM