१६ एप्रिल रोजी बार्शीटाकळी बीडीओंना पत्र प्राप्त झाले. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्व गावांतील लोकांना ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्याचे एका पत्राद्वारे सांगितले. मात्र, पत्रामध्ये त्या गोळ्यांचा लॉट नंबर किती? बॅच नंबर किती? उत्पादन तारीख आणि एक्स्पायरी डेटचा उल्लेख नाही. त्यामुळे ग्रामसेवक संभ्रमात आहेत. आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या ग्रामीण भागातील लोकांना वाटप केल्यानंतर या गोळ्यांपासून काही कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या गेल्यावर्षी डॉक्टरांसह अनेक दानशूरांनी घरोघरी जाऊन वाटप केल्या. आताच अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला कशी काय जाग आली. गतवर्षी आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या घेतल्या. परंतु, त्याचा उपयोगच झाला नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पंचायत समिती बार्शीटाकळीला आता उशिरा शहाणपण कसे काय सुचले, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शासनाच्या निर्देशामुळे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने गावातील ग्रामसेवकांमार्फत वितरित करायला सांगितल्या आहेत. आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांवर बॅच नंबर, लॉट नंबर, उत्पादन तारीख, एक्स्पायरी डेट याबाबत माहिती नाही.
-डाॅ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी
आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या शासनाच्या निर्देशानुसार वाटप करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या आयुष विभागाने राज्य शासनाला आदेशीत केल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत गोळ्यांचे वाटप होत आहे. आर्सेनिक अल्बम ३० या कंपनीचे ई टेंडरिंगसुद्धा झाले आहे.
- आर. एस. मुंढे, औषधी विभाग, जिल्हा परिषद