पिंजर हे गाव मोठे असून, येथे मुख्यालयी राहणाऱ्या ग्रामसेवकाची नितांत गरज आहे. ग्रामसेवकाने दररोज गावात येऊन ग्रामस्थांची कामे करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. पिंजर येथे आर. पी. थोरात नामक ग्रामसेवक कार्यरत आहेत. मात्र, ते प्रभारी असल्याने गावात येत नाहीत. ग्रामस्थांना शासकीय कामासाठी ग्रामपंचायतीकडे चकरा माराव्या लागतात. परंतु ग्रामसेवक हजर राहात नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामसेवक गावात आले तरी ग्रामस्थांना उद्धट वागणूक देतात. कामांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ग्रामसेवकाची त्वरित बदली करण्याची मागणी सीईओ सौरभ कटारिया यांच्याकडे करण्यात आली आहे.
पिंजरचे ग्रामसेवक गावात हजर राहात नाहीत. पिंजर येथे दररोज हजर राहणारा आणि ग्रामस्थांची कामे करणारा, शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करावी.
- अनिल बापुरावआप्पा पेध्ये, नागरिक
गेल्या तीन, चार दिवसांपासून सुट्या होत्या. बैठक होती. त्यामुळे पिंजरला हजर नव्हतो. शिवाय पिंजरचा माझ्याकडे प्रभार आहे. ग्रामस्थांच्या कामांना प्राधान्य देतो.
- आर. पी. थोरात, ग्रामसेवक, पिंजर