वणी रंभापूर (अकोला): विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी २२ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन करीत असलेल्या ग्रामसेवकांनी शासकीय धोरणाचा निषेध म्हणून शुक्रवारी अकोलापंचायत समिती कार्यालय परिसरात सामुहिक मुंडन केले.आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील ग्रामसेवकांनी २२ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अकोला तालुका ग्रामसेवक संघटनेने शुक्रवारी शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदविला. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करून पंचायत विस्तार अधिकारी या पदाची निर्मिती करणे , सर्व ग्रामसेवकांना शासनाच्या परिपत्रकानुसार प्रवास भत्ता देणे, ग्रामसेवकाची नेमणूक करताना पदवीधाराचा विचार करणे, २०११ च्या लोकसंख्येनुसार ग्रामसेवकांची पद भरती करणे, सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी २२ आॅगस्ट पासून काम बंद आंदोलनास सुरवात केली. परंतु शासनाने अद्याप एकाही मागण्याची दखल न घेतल्याने संतापले ल्या ग्रामसेवकांनी शुक्रवारी अकोला पंचायत समिती परिसरात सामुहिक मुंडण करून करून निषेध नोंदविला. यावेळी अकोला तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष निमकर्डे, ग्रामविकास अधिकारी धडसे,अहीर, शिरसाट, हिम्मत राठोड़, राजेश चव्हाण, अरविंद शिंदे आदींनी मुंडन करवून घेतले.
ग्रामसेवकांनी मुंडन करून नोंदविला शासकीय धोरणाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 4:09 PM