अकोला: पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकाऱ्यांना पदस्थापना देऊ नये, यासाठी ग्रामसेवक संघटनेने दिलेल्या निवेदनाचा विचार न झाल्याने आता संबंधित विस्तार अधिकाऱ्यांची पदस्थापना रद्द होईपर्यंत महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन अकोला तालुका शाखेच्यावतीने अधिकाऱ्यांसोबत सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तरीही पदस्थापना रद्द न झाल्यास २५ मार्चपासून धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.अकोला पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून पी. व्ही. दुधे यांना पदस्थापना देण्यात आली. त्यापूर्वी ग्रामसेवक युनियनने त्यांना पदस्थापना देण्यास विरोध केला. त्याची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यानंतर पंचायत समिती अंतर्गत सर्कलच्या कामाची वाटणीही त्यांना करण्यात आली. त्यातून ग्रामसेवक युनियनचे खच्चीकरण झाल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे संबंधित विस्तार अधिकाºयाची पदस्थापना रद्द होत नाही, तोपर्यंत ग्रामसेवक युनियनने असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच महिला संवर्ग निवडणुकीचे काम, ग्रामीण भागातील ग्रामस्थांची आवश्यक कामे केली जातील, तर पंचायत समिती स्तरावरील मासिक सभेला उपस्थित न राहणे, अहवाल न देणे, ग्रामपंचायतींचे अभिलेख न दाखविणे, सर्व प्रशासकीय कामांसाठी सहकार्य केले जाणार नाही. असहकार आंदोलनाची दखल न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश निमकर्डे, उपाध्यक्ष बबन सदांशिव व सचिव संजय गावंडे यांनी निवेदनात दिला आहे.