- राजेश शेगोकारअकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली आहे. यामध्ये अकोल्याची एकमेव जागा भारिप-बमसंसाठी तर बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या सहा जागांच्या दाव्यालाही वाटण्याच्या अक्षता लावल्याची माहिती आहे. जागा वाटपासंदर्भातील चर्चा सध्या पश्चिम वºहाडच्या राजकारणात रंगत असल्याने जागा वाटपाच्या मुद्यावरच महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप, डावे पक्ष यांचा समावेश आहे. भारिप-बमसंचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही आघाडीत समावेश व्हावा, यासाठी दोन्ही काँग्रेसने जाहीरपणे अनुकूलता दाखविली आहे; मात्र अॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत केलेल्या संगतीमुळे त्यांचा महाआघाडीतील प्रवेशाचा मार्ग थांबल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने महाआघाडीचे जागा वाटप ठरविले असून, त्यामध्ये मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडल्या जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अॅड. आंबेडकरांनी आधीच १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे अवघ्या एका जागेसाठी ते महाआघाडीसोबत जातील, ही शक्यताच मावळली आहे. दुसरीकडे महाआघाडीत प्रवेशासाठी ‘एमआयएम’ला सोडण्याची काँग्रेसची अट त्यांना मान्य नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे, त्यामुळे तसेही त्यांच्या महाआघाडीतील प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्टच झाले आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहा जागा मागितल्या असल्या, तरी हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत ते आग्रही आहेत. अशा स्थितीत स्वाभिमानीला राजू शेट्टींसाठी हातकणंगले हा एकच मतदारसंघ सोडण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीने दाखविलेली तयारी स्वाभिमानीला मान्य होणार नाही. त्यामुळे हे संभाव्य जागा वाटप महाआघाडीत बिघाडीचे आतापासूनच बीजारोपण करीत असल्याचे दिसत आहे.‘स्वाभिमानी’च्या निर्णयाकडे लक्षस्वाभिमानी शेतकरी संघटनेने जे चार मतदारसंघ मागितले आहेत, त्यामध्ये विदर्भातील बुलडाणा व वर्धा हे दोन मतदारसंघ आहेत. राजू शेट्टी गेल्यावेळी महायुतीमध्ये सहभागी असताना त्यांना त्यांच्या मतदारसंघासोबतच माढा हा मतदारसंघ दिला होता. तेच सूत्र महाआघाडीत कायम राहिले, तर त्यांना आणखी एक मतदारसंघ कदाचित मिळेल, त्यामुळे वर्ध्यासाठी माजी मंत्री सुबोध मोहिते व बुलडाण्यासाठी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यापैकी कोणासाठी ते आग्रही राहतील, यावरच या मोहिते व तुपकरांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.